स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीतर्फे स्वामी विवेकानंद आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (१४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ऍम्फी थिएटरमध्ये बौद्ध धर्मगुरू भन्ते सुमेधजी यांच्या हस्ते होणार आहे.
स्वामी विवेकानंद यांचे १५० वे जयंती वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे प्रकाशन होत आहे. रमेश पतंगे यांनी लिहिलेले हे पुस्तक विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे.
संभाजीनगर (औरंगाबाद) येथील डॉ. आंबेडकर यांचे अभ्यासक रमेश पांडव यांचे व्याख्यान यावेळी होईल. याशिवाय प्रा. विक्रम कांबळे व प्रा. विलास बेत हे पुस्तकासंबंधी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. विवेकानंद केंद्राचे प्रांत संघटक विश्वास लपालकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.या पुस्तकामुळे बहुतेक करून दुर्लक्षित राहिलेले स्वामी विवेकानंदांचे सामाजिक विचार आणि त्याच पद्धतीने दुर्लक्षित राहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धार्मिक विचार यांचे दर्शन होते, अशी माहिती संयोजक वल्लभदास गोयदानी यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधाने पुष्कळ लेखन केलेले लेखक रमेश पतंगे यांनी स्वामी विवेकानंदांच्या सामाजिक विचारांचा आढावा घेणारे पुस्तक लिहिले आहे. तो आढावा घेताना त्यांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये किती साम्य होते, हे दाखवून दिल्याचेही ते म्हणाले.